ग्रेटर नोएडा - ज्यांच्या रक्तात भारत आहे, त्यांना एअर स्ट्राइकवर संशय येईल का ? जे भारत माता की जय बोलतात ते या संशय येईल का ? जे लोक स्ट्राइकवर संशय उपस्थित करतात त्यांच्यावर भरोसा ठेवणार का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राइकवर संशय उपस्थित करण्यात आले होते, त्यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या सीमेपार घुसत बालकोट भागातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. या हल्ल्यांवर विरोधकांनी संशय उपस्थित केले मात्र ज्यावेळी हा हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानात मोदींनी दहशतवाद्यांना मारले असं बोललं जात होतं परंतु भारतातील काही लोक या हल्ल्यावर प्रश्न विचारत होते असं मोदी यांनी भाषणात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, आज देशात स्वत:ला मोठे मानणारे नेते जी भाषा वापरत आहे त्यामुळे आपल्या शत्रू राष्ट्राला त्याची मदत होतेय. देशातील जवानांच्या शौर्यावर प्रश्न निर्माण केले जात असताना पाकिस्तानात त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या मिळतात. एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान दबावाखाली आहे. मात्र शंका उपस्थित करणारी माणसे बालकोट भारतात आहे की पाकिस्तानात यावर चर्चा करत राहिले.
जशास तसे उत्तर देणार 2016 मध्ये पहिल्यांदा आमचे सरकार आल्यानंतर दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं गेलं, उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक केला त्याचे पुरावे हे लोक मागत आहेत. आता पुलवामा हल्ल्यानंतरही भारतीय जवानांनी जे साहसाचे काम केले ते गेल्या कित्येक वर्ष झाले नाही. आमच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारलं.
आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलले शत्रूच्या मनात भारताविषयी जे विचार त्यासाठी 2014 पूर्वीच्या सरकारचं अपयश आहे. 26 नोव्हेंबर झालेला मुबंईवरील हल्ला कोणी विसरु शकत नाही. त्यावेळीच दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करणे गरजेचे होते. मात्र सरकार गप्प बसून राहिली. त्यावेळी जवानांचे रक्त उसळत होते तेव्हा दिल्ली शांत होती. त्यामुळेच 26/11 नंतरही देशावर अनेक दहशतवादी हल्ले झाले. आधीचे सरकार धोरण बदलत नव्हती तर फक्त गृहमंत्री बदलत होती असा आरोप मोदी यांनी केला. त्याचसोबत हा पूर्वीचा भारत नाही तर नवीन भारत आहे, जो दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशाराही मोदी यांनी दिला.