नवी दिल्ली: अलीकडेच भारतीय अंतराळ संस्था इस्रोने (ISRO) आपली महत्वकांशी चंद्रमोहीम यशस्वी केली. या मोहिमेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यादरम्यान, भाजपने इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काँग्रेसच्या काळात इस्रोच्या परिस्थितीबद्दल बोलत आहेत. व्हिडिओमध्ये नंबी म्हणतात की, त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे होते, त्यांनी अवकाश संशोधनाला कधीच प्राधान्य दिले नाही. तत्कालीन सरकारने निधीचे वाटप केले नाही. हा व्हिडिओ शेअर करून भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपने ट्विट केले की, 'माजी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, इस्रोकडे संशोधन कार्यासाठी जीप किंवा कार नव्हती. त्यांच्याकडे फक्त एकच बस होती, जी शिफ्टमध्ये धावायची. जेव्हा पंतप्रधान मोदींनी बजेटमध्ये वाढ करण्याची हमी दिली आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या यश-अपयशांमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहिले, तेव्हा भारताच्या अंतराळ मोहिमेत बरीच प्रगती झाली आहे.'
कोण आहेत नंबी नारायणन?नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते. त्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे ठरले आणि सरकारला त्याची भरपाईही करावी लागली. नंबी यांनी भारतात लिक्विड इंधन रॉकेट तंत्रज्ञान आणले.
या तंत्रज्ञानाचा वापर ISRO ने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) आणि जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV) सह अनेक रॉकेटसाठी केला आहे. नंबी नारायणन यांनी त्यांच्या कारकिर्दीत विक्रम साराभाई, सतीश धवन आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केले. अभिनेता आर माधवनने नंबी यांच्या आयुष्यावर आधारित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट बनवला आहे.