मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता होरपळली असताना आता सिलेंडरच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलेंडरचा दर 2 रुपये 34 पैसे, तर अनुदानित सिलेंडरचा दर 48 रुपयांनी वधारला आहे. देशातील 81 टक्के कुटुंबं सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे. सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत 491.31 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत 493.55 रुपये इतकी होईल. याशिवाय अनुदानित सिलेंडरसाठी कोलकात्यात 496.65 रुपये, चेन्नईत 481.84 रुपये मोजावे लागतील. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडरसाठी 48.50 रुपये अधिक द्यावे लागतील. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडर 671.50 रुपयांना मिळेल. तर विनाअनुदानित सिलेंडरसाठी दिल्लीत 698.50 रुपये, कोलकात्यात 723.50 रुपये, चेन्नईत 712.50 रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. सिलेंडरचे दर भडकले असताना पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये थोडीशी घट झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर सलग तिसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. मात्र ही कपात फक्त 6 पैशांची आहे. सलग 16 दिवस इंधन दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली होती. यानंतर बुधवारी इंधनाच्या दरात पहिल्यांदा कपात झाली. मात्र ती केवळ एका पैशाची होती. यानंतर गुरुवारी इंधनाचे दर 7 पैशांनी घटले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी झाल्यानं इंधन दरात घट पाहायला मिळतेय.
पेट्रोल, डिझेलनंतर एलपीजी सिलेंडरचा भडका; विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 10:06 AM