ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - भारतातील विंचवाची पाकिस्तानमधील मागणी वाढली असून एक काळा विंचू तब्बल सव्वा लाख रुपयांना विकला जात असल्याची उघडकीस आले आहे. अत्यंत विषारी समजल्या जाणा-या विंचूचे पाकमध्ये काय केले जाते याविषयी कमालीचे गूढ निर्माण झाले आहे.
पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सीमा रेषेपासून जवळ असलेल्या एका गावात मध्यप्रदेशमधून आलेल्या शिवनारायण सुर्यवंशी आणि राज सिंह या दोघांना अटक केली आहे. या दोघांकडे दोन काळे विंचू आढळले असून या विंचूवांची पाकमध्ये तस्करी केली जाणार होती अशी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. शिवनारायण आणि राज या दोघांचाही इंटरनेटवरुन पाकमध्ये राहणा-या एका महिलेशी ओळख झाली होती व याच महिलेने विंचू पाठवले जाणार होते असे उघड झाले आहे. एका विंचूसाठी दोघांनाही तब्बल २ हजार डॉलर्स ( सुमारे १ लाख २३ हजार रुपये) मिळणार होते. कराचीतील जिया मिश्रा नामक महिला या दोघांशी संपर्कात होती.
पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विंचवाची मागणी वाढली असून तस्करी करणारी टोळी जीवाशी खेळून हे विषारी विंचू पुरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्येही विंचूच्या तस्करीविषयी चर्चा रंगली आहे. मात्र या विंचवाचा वापर कशासाठी केला जातोय हे अद्यापही न उलगडलेले कोडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विंचूच्या विषापासून औषध तयार करण्याविषयी संशोधन सुरु असून यासाठी याचा वापर होत असावा अशी शक्यता आहे.
वजनानुसार ठरते किंमत
५० ग्रॅम वजन असलेल्या विंचूला दोन हजार डॉलर्स मिळतात. तर १०० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असलेल्या विंचवाला यापेक्षाही जास्त भाव मिळतो असे तपासातून समोर आले आहे.