नवी दिल्ली-
भारत बायोटेकच्या कोरोना विरोधातील नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढ्यात नेझल लसीला गेल्याच आठवड्यात वापराची परवानगी देण्यात आली आहे. या लसीची किंमत ८०० रुपये इतकी असणार असून त्यावर खासगी रुग्णालय ५ टक्के जीएसटी आकारू शकतात.
जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना भारतानं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने गेल्या शुक्रवारी याच तयारी अंतर्गत कोरोनाच्या नेझल लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही लस बूस्टर म्हणून वापरली जाईल आणि खाजगी रुग्णालयांमध्ये प्रथम उपलब्ध होईल.
नेझल लसीसाठी कसं अप्लाय कराल?भारत बायोटेकची नेझल लस आजपासून CoWIN अॅपवर उपलब्ध होईल. यासंदर्भात CoWIN प्लॅटफॉर्ममध्येही बदल करण्यात येणार आहेत. देशातील कोणताही व्यक्ती फक्त CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करू शकतो आणि लस स्लॉटसाठी अप्लाय करू शकतो. ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल आणि आजपासून कोविड-19 लसीकरण प्रोग्राममध्ये समाविष्ट केली जाईल.
कोण घेऊ शकतं ही लस?१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना iNCOVACC नेझल लस मिळू शकते जी भारत सरकारनं मंजूर केली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून वापरली जात आहे. नेझल लसीचे इंजेक्शनच्या तुलनेत बरेच फायदे आहेत. नेझल लसीची साठवण, वितरण आणि कमी कचरा निर्मिती होते. तसंच नाकावाटे दिली जाणारी लस विषाणूच्या एन्ट्री पॉइंट म्हणजेच नाक आणि श्वसनमार्गाला संरक्षण प्रदान करते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"