काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कानडी संस्कृतीचा अभिमान व संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:38 AM2018-04-28T00:38:44+5:302018-04-28T00:38:44+5:30
जनतेच्या मनातील बात : १ कोटींना नोकऱ्या, तरुणांना स्मार्टफोन, घराघरात पाणी व मोफत शिक्षण
मंगळूर : कानडी भाषा, संस्कृती, नृत्य, संगीत, साहित्य, लोकसंगीत व लोकसंगीत यांना प्रोत्साहन व त्यांचे संवर्धन यांचे आश्वासन असलेल्या काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यात १ कोटी लोकांना रोजगार तसेच तरुणांना स्मार्टफोन ही आश्वासने देण्यात आली आहेत. कानडी अभिमानावर भर असाच या जाहीरनाम्याचा एकूण सूर आहे.
कानडी भाषेच्या विकासासाठी धारवाडमध्ये साहित्य भाषा प्राधिकरण व गदगमध्ये कानडी साहित्य व संगीत, काव्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नाट्यगृह स्थापन करण्याची घोषणाही यात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रकाशित करताना भाजपा व पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व अनेक काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.
मागच्या जाहीरनाम्यात दिलेली ९५ टक्के आश्वासने आमच्या सरकारने पूर्ण केली असल्याचा दावा करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी केवळ मन की बात नावाचा कार्यक्रम करतात. आम्ही प्रत्यक्षात जनतेच्या मनातील बात जाहीरनाम्यात उतरवली आहे. मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही.
या जाहिरनाम्यात द. रा. बेंद्रे, एन. के. कुलकर्णी, आर. सी. हिरेमा, डॉ. पॉल पुअप्पा, जी. पी. अमुर, गिराद्दी गोविंदराज, चन्नावीरा कनावी या साहित्यिक, लेखक तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख आवर्जून केला आहे. कानडी साहित्य-संस्कृती आणि इतिहासातील कवी, संत, साहित्यिक व अन्य मान्यवरांचा यातील उल्लेखामुळे प्रथमच पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील वेगळेपण दिसत आहे.
बसवेश्वर यांचाही उल्लेख
जाहीरनाम्यात बसवेश्वर यांंचाही उल्लेख आहे. त्यांच्या सर्वधर्मसमभावावर आमचा विश्वास आहे, असे त्यात म्हटले आहे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबरच कर्नाटकातील काँग्रेसचे नेते देवराज अर्स यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही विकास कार्य करीत आहोत, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे : याशिवाय प्रत्येक घरात पाणी, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट, शेतकºयांच्या साह्यासाठी विशेष निधी, उत्तम दर्जाचे शिक्षण, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, अल्पसंख्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा ही आश्वासनेही काँग्रेसने मतदारांना दिली आहेत.
येत्या पाच वर्षांत राज्यातील १ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले असून, सर्व तरुणांना स्मार्टफोन देण्याचेही घोषित केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाने अत्यल्प निधी परत करून कर्नाटकवर अन्याय केल्याचा उल्लेख त्यात आहे. तसेच राज्यांच्या अधिकारांवर केंद्राकडून होणाºया अतिक्रमणाचा मुद्दाही त्यात आहे.