ऑनलाइन लोकमत
आरा (बिहार), दि. १८ - येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणा-या बिहारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सव्वा लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. याखेरीज आधी जाहीर केलेले ४० हजार कोटी रुपयांचे पॅकेज विचारात घेतलं तर निवडणुकांचे वारे वाहू लागलेल्या बिहारला केंद्र सरकारने एकूण मिळून १.६५ लाख रुपये कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. बिहारला एक नवी ताकद मिळावी अशी आपली इच्छा असल्याचे ते यावेळी म्हणाले. आरा येथे राष्ट्रीय महामार्ग प्रोजेक्टचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या सभेत या पॅकेजची घोषणा करतानाच या पॅकेजमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रोजेक्टसचे ४० हजार कोटीही समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
या सभेदरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यावरही निशाणा साधला. बिहारला 'बिमारू' राज्य म्हटल्याने मुख्यमंत्री नाराज झाले. जर बिहार 'बिमारू' नसेल तर मग ( त्यांना) केंद्राकडून मदत कशासाठी हवी असा सवाल करत पंतप्रधानांनी नीतिशकुमार यांच्यावर टीका केली.
बिहारमध्ये त्यांनी सहरशा येथेही एक सभा घेतली असून स्थानिक मैथिली भाषेत बोलण्याची सुरुवात करत त्यांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
वा-याची दिशा स्पष्ट समजत असून इथलं सरकार बदलण्याचे वारे वाहत असल्याचे त्यांनी सूचित केले. नितिशकुमारांचं नाव न घेता मोदींनी व्यक्तिगत अहंकार किती मोठा असतो असे सांगत त्यांच्यावर टीका केली. मी माझ्यावर झालेल्या व्यक्तिगत टीकेला प्रतिवाद करत नाही, तर अशी टीका सहन करण्यासाठी सक्षम करतो.
सात वर्षांपूर्वी कोशी आंचलच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गुजरातमधल्या जनतेच्यावतीने माझ्या सरकारने पाच कोटी रुपयांची मदत केली. परंतु स्वत:च्या अहंकारापोटी त्यांनी लोकांचं काय व्हायचं ते होऊदे अशी भूमिका घेत तो चेक परत पाठवल्याची आठवण नरेंद्र मोदींनी करून दिली. मी स्वत: तो अपमान विसरून गेलो आणि लोकांची पीडा दूर व्हावी म्हणून काही लोकांना गुपचूप मदत करायला सांगितली असेही मोदी म्हणाले.