नवी दिल्ली : नाशिकचे योगतज्ज्ञ विश्वास मंडलिक व मुंबईतील योग इन्स्टिट्यूट या संस्थेला योगविद्येच्या प्रसार व विकासासात भरीव कामगिरीबाबत यंदाचे पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाले. मानचिन्ह, मानपत्र व प्रत्येकी २५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.२१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी देशभरातून विविध गटांत १८६ नामांकने प्राप्त झाली होती. या नावांची छाननी दोन समित्यांकडून करण्यात आली.आयुष्य मंत्रालयाने सांगितले की, प्राचीन ग्रंथांचे अध्ययन करुन विश्वास मंडलिक यांनी पतंजली व हटयोगाचे उत्तम ज्ञान मिळवले. १९७८ साली योग धाम विद्या या संस्थेची पहिली शाखा त्यांनी सुरु केली. आता या संस्थेच्या देशात १६० शाखा आहेत. त्यानंतर योगविद्या शिकविण्यासाठी मंडलिक यांनी १९८३ साली योग विद्या गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली. योगविद्येवर त्यांनी ४२ पुस्तके लिहिली असून, या विषयाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ३०० सीडी त्यांनी तयार केल्या आहेत.मुंबईतील योग इन्स्टिट्युट ही १९१८मध्ये योगेंद्रजी यांनी स्थापन केली. यंदा या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली. या संस्थेने आजवर ५० हजारपेक्षा अधिक योगविद्या शिक्षक तयार केले आहेत तसेच योगविद्येबद्दल ५००हून अधिक पुस्तके योग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केली आहेत.पंतप्रधान डेहराडूनमध्ये करणार योगासनेउत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनांचा एक भव्य कार्यक्रम भरवण्यात येईल. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: योगासने करणार आहेत. योगविद्येचा देशातील तरुणांनी अंगिकार करावा यासाठी हा कार्यक्रम आयोजिण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन येथे गुरुवारी होणाºया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
मंडलिक व योग इन्स्टिट्यूटला पंतप्रधान पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:34 AM