लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी हे देशातील शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत आणि वारंवार चर्चा करुन ते शेतकऱ्यांना थकवू पाहत आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी यांना लक्ष्य केले. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पण, त्यांचा रिमोट कंट्रोल तीन- चार लोकांकडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी जंतर- मंतर येथे जाऊन पंजाबमधील त्या संसद सदस्यांप्रती एकजूटता प्रकट केली जे गत ४० दिवसांपासून कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. पंजाबशी संबंधित काँग्रेसचे लोकसभा सदस्य जसबीर गिल, गुरजीत औजला, रवनीत सिंह बिट्टू आणि अन्य नेते आंदोलन करतआहेत.
राहुल गांधी म्हणाले की, मोदी म्हणत आहेत की, कोरोनामुळे देशाचे नुकसान झाले. मात्र, नुकसान तर कोरोनाच्या अगोदर झाले. वस्तुस्थिती ही आहे की, मोदी आणि त्यांचे दोन- तीन उद्योगपती मित्र आपल्याकडून सर्वकाही हिसकावून घेत आहेत. हेच उद्योगपती सर्वकाही चालवित आहेत. शेतकऱ्यांना हे लक्षात यायला हवे की, वेळकाढूपणा केला जात आहे आणि त्यांना थकविले जात आहे. एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, दोन काय अथवा शंभर काय मोदी यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना असे वाटते की, शेतकरी थकून जाईल आणि पळून जाईल. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे की, शेतकरी पळून जाणारा नाही. आपल्याला पळून जावे लागेल.
आज शेतकरी, उद्या मध्यमवर्गीयांचा नंबर n राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे काही वेळ पक्षाच्या या संसद सदस्यांसोबत आंदोलनस्थळी बसले. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी भूसंपादन कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही त्यांना रोखले. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांना संपविणारे कायदे आहेत. n ज्या दिवशी खाद्य सुरक्षा समाप्त होईल त्यादिवशी स्वातंत्र्य संपुष्टात येईल. ते म्हणाले की, एकीकडे देश आहे आणि दुसरीकडे मोदी यांचे काही भांडवलदार मित्र. देशातील अनेक लोकांना ही बाब लक्षात आली नाही की, आज शेतकऱ्यांचा अधिकार हिसकावला तर उद्या मध्यमवर्गीयांचा नंबर आहे. त्यानंतर दुसरे लोकही आहेत.