अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी आले आहेत. पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर वडनगरलायेण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेला भेट दिली. यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते. शाळेची पायरी चढताच जमीनीवर माथा टेकवला आणि कपाळाला शाळेची माती लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते त्यांच्या जन्मगावी वडनगरला पोहचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्ताच्याकडेला पंचक्रोशीतील हजारो लोक उभे होते. मात्र गावात जाताच त्यांनी सर्वात आधी त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला भेट दिली आणि शाळेची माती कपाळाला लावली. त्यानंतर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यात जाऊन पाहणी केली.
विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात शाळेला भेट देण्याचा उल्लेख नव्हता. लहानपणी मोदी त्यांच्या वडिलांसोबत याच वडनगर रेल्वेस्टेशनवर चहा विकायचे.
मोदींच्या स्वागतासाठी वडनगरला उत्सवनगरीचं स्वरुप आलं असून प्रवेशद्वारावरच थ्री-डीच्या माध्यमातून मोदींच्या बालपणापासूनच्या फोटोंचं सादरीकरण करण्यात आलं आहे. वडनगर रेल्वे स्टेशनवरील ज्या स्टॉलमध्ये मोदींनी चहा विकला होता, तो स्टॉलही सजवण्यात आला आहे. पर्यटन आणि रेल्वे मंत्रालयाकडून हा स्टॉल पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जात आहे. मोदींच्या आठवणी असलेल्या वनडनगरमधील इतर स्थळांचाही विकास केला जात आहे.
दरम्यान, शाळेला भेट दिल्यानंतर मोदी यांनी वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात जाऊन पुजा-अर्चा केली. गुजरातमधील हे भगवान शंकराचं अतिप्रचीन मंदिर आहे. त्यानंतर मोदींच्या हस्ते 600 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं. याशिवाय मोदींनी वनडनगर रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन केलं. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणीही उपस्थित होते.