नवी दिल्ली - भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो 17 फेब्रुवारीपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत अशा आठवड्याभराच्या भारत दौ-यावर आहेत. मात्र या दौ-यादरम्यान जस्टिन ट्रुडो यांच्याहून त्यांचा छोटा मुलगा सर्वाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. जस्टिन ट्रुडो आपल्या तीन अपत्यांसहीत (एक मुलगी व दोन मुले) भारताच्या दौ-यावर आले आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळाहून बाहरे येताना जस्टिन ट्रुडो यांचा छोटा मुलगा हॅड्रियन फुलांचा गुच्छा घेत सर्वांच्या पुढे तुरू तुरू चालताना दिसला. हॅड्रियनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याला प्रचंड पसंती दर्शवली.
विमानतळाहून बाहेर येताना 3 वर्षांच्या गोंडस हॅड्रियनचा सुंदर फोटो कॅमे-यात कैद करण्यात आला आहे. ट्विटरवर या फोटोला नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. शिवाय, या क्युट फोटोवरुन नेटीझन्सनी हॅड्रियनची तुलना सैफ अली खानच्या तैमुरसोबतही करण्यात आली आहे. काही युजर्सनी तर या आठवड्यात हॅड्रियननं तैमुरची जागा घेतल्याचंही ट्विट केले.
यानंतर रविवारी (18 फेब्रुवारी) आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचलेल्या सहकुटुंब पोहोचलेल्या जस्टिन ट्रुडो यांनी हॅड्रियनला हवेत फेकून त्याला पुन्हा झेलल्याचा फोटोदेखील नेटीझन्सना खूपच आवडला आहे. या दौ-यादरम्यान जस्टिन ट्रुडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण, दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सहकार्यासहीत अनेक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. आग्र्यानंतर जस्टिन मुंबई, अहमदाबाद, अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती.
बॉक्सर, अॅक्टर पंतप्रधान बॉक्सिंग करणारे, शाळेत शिकवणारे जस्टिन हे खरंच आगळावेगळे पंतप्रधान आहेत. जस्टिन तरुणांच्या चर्चामधे विविध कारणांनी येत आहेत. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल इथपासून त्यांच्या विविध मतांर्पयत माध्यमांसकट सर्वत्र चर्चा होत आहे. टॅटू असणारे ते जगातले पहिलेच पंतप्रधान असावेत. त्यांच्याबाबत सांगण्याजोगी आणखी एक वेगळेपणाची बाब म्हणजे पहिल्या महायुद्धावर आधारित 'द ग्रेट वॉर' या सिनेमातही त्यांनी काम केले आहे.