ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ७ - तीन दिवसांच्या अमेरिका दौ-यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटून व्दिपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत तसेच अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार आहेत.
स्वित्झर्लंड दौ-यावरुन मोदी अमेरिकन प्रमाणवेळेनुसार दुपारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. स्वित्झर्लंड दौ-यात मोदींनी न्यूक्लियर सप्लायर ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशासाठी महत्वपूर्ण असलेला स्वित्झर्लंडचा पाठिंबा मिळवला. स्वित्झर्लंड एनएसजीचा सदस्य आहे.
मोदी यांचा अमेरिका दौरा भरगच्च कार्यक्रमांनी व्यापलेला आहे. अमेरिकन काँग्रेसमध्य भाषण करणारे ते भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौ-यावर आले आहेत.
२०१४ पासून मोदी यांचा हा चौथा अमेरिका दौरा असून, मोदी आणि ओबामा यांची सहावी भेट आहे. आज ते ओबामांची भेट घेणार आहेत. मोदी पाच देशाच्या दौ-यावर आहेत. अफगाणिस्तानवरुन कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि त्यानंतर मोदी मेक्सिकोला जाणार आहेत.
मोदींच्या उपस्थितीत अमेरिकेने परत केल्या प्राचीन भारतीय मुर्त्या
अमेरिका दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेने काही प्राचीन मुर्त्या भारताला परत केल्या आहेत. यात जैन मुर्ती, ब्रॉंझच्या गणेशमुर्तीचा समावेश आहे. चोरी किंवा अन्य मार्गाने अमेरिकेत आलेल्या प्राचीन भारतीय मुर्त्या भारताला परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अमेरिका जवळपास अशा २०० मुर्त्या भारताला परत करणार आहे.