गेले 38 दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. यावेळी भाजपच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सर्व नव्या मंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. तसेच, प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्तींचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेली उत्तम टीम -ट्विट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
दोन-तीन दिवसांत होणार खातेवाटप -यासंदर्भात बोलताना शिंदे सरकारमधील मंत्री गिरीश महाजन म्हणाले, उद्या कॅबिनेट आहे. जो अडीच वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी डबल स्पीडने काम करावे लागेल. आता केंद्र आणि राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांना गती देता येईल. आम्हाला विकासाचा वेग भरून काढायचा आहे. दोन-तीन दिवसांत खातेवाटप होईल.अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तारआज शपथ घेतलेल्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यातच, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी स्वतःच यावर भाष्य करत, "प्रत्येकाला वाटते, की मी मंत्री झालो पाहिले. तेसे मलाही वाटतेना. पण याचा अर्थ असा नाही, की मी नाराज आहे. आमचा शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, आपण नाराज नाही," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.