बंगळुरु, दि. 6 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्याच घराबाहेर निर्घृण हत्या करण्यात आल्याने सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच निषेध व्यक्त केला आहे. एकीकडे हत्येविरोधात संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे काही लोक मात्र या हत्येचं समर्थन करताना दिसत आहेत. ट्विटर आणि फेसबूवकर काहीजणांनी हत्येच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. यानंतर त्यांच्याविरोधात टिकेचा सूर उमटला असून युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.
यामधील सर्वात जास्त चर्चेला आलेलं ट्विट आहे ते निखिल नावाच्या व्यक्तीचं. निखिलने आपल्या ट्विटमध्ये अत्यंत आक्षेपार्ह शब्दात गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन केलं आहे. त्याने गौरी लंकेश यांची हत्या योग्य असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. यानंतर युजर्सनी निखिलला ट्रोल करत कडक शब्दांत सुनावलं आहे. मात्र ज्या गोष्टीची सर्वात जास्त चर्चा सुरु आहे, ती म्हणजे अशा आक्षेपार्ह भाषेत बोलणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत आहेत.
अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा व्यक्तीला फॉलोच कसं काय करु शकतात असा प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर निखिलच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनाही टार्गेट केलं जात आहे. मोदी नेहमीच अशा प्रकारच्या लोकांना पाठिंबा देत असतात असाही आरोपही करण्यात येत आहे.
युजर्सनी टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर निखिल याने ट्विट डिलीट करत याचा गौरी लंकेश यांच्या हत्येशी कोणताही संबंध नव्हता असा दावा केला आहे. अशाप्रकारे पंतप्रधानांना टार्गेट करणंही चुकीचं असल्याचं तो बोलला आहे.
दरम्यान फेसबूकवरही दोघांनी गौरी लंकेश यांच्यासंबंधित आक्षेपार्ह पोस्ट केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिली आहे. 'माझी आणि त्यांची काही दिवसांपुर्वी भेट झाली होती, मात्र आपल्याला काही धोका असल्याचा उल्लेख त्यांनी केला नव्हता', अशी माहिती त्यांनी दिली. तसंच हे एक षडयंत्र होतं का याबद्दल आत्ता सांगू शकत नसल्याचंही ते बोलले आहेत.
मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांना जलदवेगाने तपासाला सुरुवात करत एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांच्या हाती एक संशयित लागला आहे. या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.