ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २० - आपल्या परदेश दौ-यांमुळे बहुतांश वेळा विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विदेश दौ-यावर जाण्यास सज्ज झाले असून जून महिन्यात ते अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा अमेरिका दौरा असून यावेळी मात्र ते राज्याच्या दौ-यावर (स्टेट व्हिजीट) जाणार असून भारत व अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीच पंतप्रधान मोदींना या दौ-याचे निमंत्रण दिले आहे. या दौ-याची नेमकी तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी पंतप्रधान मोदी जूनच्या दुस-या आठवड्यात ७ व ८ जून रोजी अमेरिकेला जातील असे समजते.
दोन देशांमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने 'स्टेट व्हिजीट' अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या दौ-यांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पॉम्प, औपचारिक डिनर तसेच आणखी काही विशेष समारंभ आयोजित केले जातात. आपले सहकारी व मित्र राष्ट्रांना सन्मानित करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी आजवर स्टेट व्हिजीटचा उपयोग केला आहे. तसेच काही वेळा विरोधी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठीही 'स्टेट व्हिजीट'ची कूटनिती अवलंबली जाते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात १० स्टेट व्हिजीटचे यजमानपद भूषवले आहे. त्यामध्ये चीनसाठी २ तर इतर वेळेस मेक्सिको, जर्मनी, दक्षिण कोरिया, ब्रिटन, फ्रान्स, जपान व कॅनडा या आपल्या सहकारी व शेजारी राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी ही स्टेट व्हिजीट आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान बराक ओबामा यांच्याद्वारे 'स्टेट व्हिजीट'चे निमंत्रण मिळणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान नसून यापूर्वी २००९ साली ओबामा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या दौ-याचे निमंत्रण दिले होते. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधानांना (स्टेट व्हिजीटचे) निमंत्रण देऊन बराक ओबामा भारत व अमेरिकेदरम्यानचे संबंध आणखी मजबूत करू इच्छितात, असे दिसते.
८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार असून त्यापूर्वी होणा-या पंतप्रधान मोदींच्या दौ-यादरम्यान ओबामा व मोदी यांच्यात अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.