मुंबई, दिल्लीसारख्या शहरांत स्वत:चे घर होणे हे अनेकांचे स्वप्न असते. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड हजार कुटुंबांना त्यांच्या घराची चावी सोपविली. या लोकांना ही २५ लाख रुपये किंमतीची घरे अवघ्या १.७० लाख रुपयांना मिळाली आहेत.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आज विविध विकासकामांचे उद्घाटन केले. अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट भागात झोपडपट्टी धारकांना झोपु योजनेअंतर्गत सदनिका देण्यात आल्या. १६७५ कुटुंबांना आज त्यांच्या घराच्या चाव्या देण्यात आल्या.
या योजनेनुसार घर बांधण्यासाठी २५ लाखांचा खर्च आला आहे. लाभार्थ्यांना याच्या ७ टक्केच रक्कम द्यायची आहे. यानुसार १.४२ लाख रुपयांत हे घर त्यांचे होणार आहे. तर पुढील पाच वर्षांच्या मेंटेनन्ससाठी लाभार्थ्यांना आणखी ३० हजार रुपये भरावे लागणार आहेत. अशाप्रकारे १.७२ लाख रुपयांत हे घर त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
या कार्यक्रमावेळी मोदी यांनी आपला जोरदार टोले लगावले. केजरीवाल यांच्या बंगल्यावरील खर्चावरून मला वाटले असते तर मी देखील शीशमहाल बनवू शकलो असतो. पण माझ्यासाठी देशवासियांना घर मिळावे, हे स्वप्न होते. आज ना उद्या त्यांचे पक्के घर नक्की बनेल, असे मोदी म्हणाले. मी स्वत:साठी कधी कोणते घर बांधले नाही हे देशाला चांगले माहिती आहे. परंतू गेल्या १० वर्षांत ४ कोटी लोकांचे स्वप्न जरूर पूर्ण केले आहे. या सर्वांच्या आनंदाचा भाग बनण्यासाठी मी इकडे आलो आहे, असे मोदी म्हणाले.