मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:32 PM2024-07-03T15:32:15+5:302024-07-03T15:33:13+5:30
Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. तसेच मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. मणिपूरमध्ये आता हिंसाचार कमी होत आहे. तसेच शांतता प्रस्थापित होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राजकारण करू नये. जे लोक मणिपूरच्या विषयावरून आगीत तेल ओतत आहेत. त्यांना मणिपूर एक दिवस नाकारेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाची माहितीही दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये संबोधित करताना म्हणाले की, मणिपूरबाबत मागच्या अधिवेशनात मी सविस्तर बोललो होतो. त्यावेळी उल्लेख केलेल्या बाबींची मी आज पुनरावृत्ती करू इच्छितो. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तिथे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत ११ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. मणिपूर हे एक लहान राज्य आहे. ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे शांततेवर विश्वास ठेवणं शक्य होत आहे. आज मणिपूरमधील बहुतांश भागात सामान्यपणे शाळा सुरू आहेत. कॉलेज सुरू आहेत. तसेच कार्यालये आणि उद्योग संस्थाही सुरू आहेत.
यावेळी काँग्रेसच्या सत्ताकाळात मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि राष्ट्रपती राजवटीची आठवणही करून दिली. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी हे विसरू नये की, याच कारणामुळे मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती. तरीही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९९३ मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर जवळपास ५ वर्षे ही अशांततेची मालिका सुरू होती.