लोकसभेचे सदस्यत्व अर्थात खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. लकसभा सदस्यत्व रद्द झाल्यापासून सुमारे 24 तासांनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लक्ष्य केले. या दरम्यान, त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. माफी मागण्याच्या मुद्द्यावर राहुल म्हणाले, "माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे." गांधी कुणालाही माफी मागत नाहीत.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अदानींचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. अदानी यांचा नरेंद्र मोदींशी काय संबंध आहे? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुरूंगात बंद केले जाऊ शकते. तर मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहणार.'
राहुल म्हणाले, 'मी संसदेत आहे की संसदेच्या बाहेर, मला फरक पडत नाही. त्यांनी मला मारहाण केली किंवा तुरूंगात टाकले, तरी मी माझे काम करतच राहणार. पंतप्रधानांना एका साध्या प्रश्नापासून वाचविण्यासाठी हे संपूर्ण नाट्य करण्यात आले आहे. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपये कुणाचे गेले? मी या धमक्या, अपात्रता अथवा तुरूंगात जाण्यास भीत नाही. 'पंतप्रधानांना माझ्या पुढच्या भाषणाची भीती' -काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'मी अनेक वेळा बोललो आहे की, भारतात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची नव-नवीन उदाहरणेही रोज बघायला मिळत आहेत. मी संसदेत पुरावे दिले, अदानी आणि PM मोदी यांच्या नात्यासंदर्भात बोललो. अदानी यांना नियमांत बदल करून एअरपोर्ट दिले गेले. या संदर्भात मी संसदेत बोललो. पंतप्रधान माझ्या पुढील भाषणाला घाबरले. यामुळेच मला अपात्र ठरवण्यात आले.