पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:07 AM2024-05-05T06:07:56+5:302024-05-05T06:08:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा (युवराज) असा करतात. त्या वक्तव्याला प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लखानी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहेनशहा असून ते महालात राहतात. त्यांचा जनतेशी असलेला संपर्क संपूर्णपणे तुटलेला आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा (युवराज) असा करतात. त्या वक्तव्याला प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गुजरातमधील बनासकांठा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार गेनीबेन ठाकोर यांच्या प्रचारासाठी लखानी येथे झालेल्या सभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी माझा भाऊ राहुल गांधी यांना शहजादा म्हणतात. पण, मी त्यांना सांगू इच्छिते की, हा शहजादा लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमी पायी चालत गेला. तो असंख्य बंधू-भगिनी, शेतकरी, कामगार यांना भेटला. त्यांचे प्रश्न कसे सोडविता येतील याविषयी राहुल गांधी यांनी लोकांशी चर्चा केली.
शहजाद्याला पंतप्रधान बनविण्यासाठी पाकिस्तान आतुर झाला आहे. शत्रूंना भारतामध्ये केंद्रात दुर्बल सरकार हवे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील सभेत केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे शहेनशहा आहे. एकही सुरकुती नसलेले, अतिशय स्वच्छ कपडे घालणारे, डोक्यावरचे केस अजिबात न विस्कटलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सर्वजण नेहमीच पाहात असाल. अशा व्यक्तीला सर्वसामान्य लोकांच्या काबाडकष्टाचे महत्त्व कसे समजणार? त्यांना शेतीतल्या समस्यांचे आकलन कसे होणार? त्यांना सामान्य माणसांचे प्रश्न, महागाईने होरपळलेली जनता याची दु:खे कधीही समजणार नाहीत. (वृत्तसंस्था)
‘भाजपला देशाची राज्यघटना बदलायची आहे’
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले की, भाजपला देशाची राज्यघटना बदलायची आहे.
लोकांना राज्यघटनेने दिलेले हक्क कमी करायचे आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम केले आहे.