नवी दिल्ली : अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे व्रत राखले आहे. ते या कालावधीत जमिनीवर ब्लँकेट अंथरूण त्यावर झोपत असून, रोज फक्त नारळपाणी प्राशन करत आहेत. त्याचबरोबर मोदी गोपूजा तसेच अन्नदानासहित विविध प्रकारचे दान करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे मोदी विविध वस्त्रांचे दानही करत आहेत. रामभक्त म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत देशातील विविध भागांतल्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. त्यामध्ये नाशिकचे श्री काळाराम मंदिर, आंध्र प्रदेशमधील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर, गुरुवायूर मंदिर, केरळमधील त्रिप्रयार श्री रामस्वामी मंदिराचा समावेश आहे. तसेच येत्या दोन दिवसांत ते तामिळनाडूतील काही मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेणार आहेत. ही सर्व मंदिरे प्रभू रामचंद्राशी संबंधित आहेत.
सांस्कृतिक जडणघडण बळकट करण्याचे प्रयत्नसूत्रांनी सांगितले की, नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विविध मंदिरांत गेल्यानंतर तेथील भाषेत रामायणाचे श्रवण करत आहेत. तसेच मंदिरातील भजनांतही सहभागी होत आहेत. ‘भारतीय’ म्हणून असलेली सामाजिक-सांस्कृतिक जडणघडण अधिक बळकट करणे, हे त्यांच्या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता राखली जावी, या उद्देशानेच पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात स्वत: साफसफाई केली. त्यापासून अनेक लोकांनी प्रेरणा घेतली आहे.