बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाची स्वतःची अशी विशिष्ट शैली आहे. त्यांच्या भाषणातील एक खासीयत म्हणजे ते ज्या ठिकाणी जातात, तेथील प्रांतीय भाषेत नेहमीच ते भाषणाला सुरुवात करतात. मात्र, आज बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांना बेळगावची बहुल लोकसंख्या मराठी असल्याचा विसर पडला आणि कर्नाटक दौरा गृहीत धरून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली. यामुळे समस्त मराठी भाषिक जनतेचा हिरमोड झाला.मराठी भाषा दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करावी, अशी मागणी महाराष्ट्रातील शिवसेना नेते राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून केली होती. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली आणि यामुळे समस्त मराठी भाषिकांच्या भावनांवर पाणी फेरले गेले.आपल्या भाषणात सातत्याने त्यांनी ‘बेळगाव’चा उल्लेख ‘बेळगावी’ असा केला. शिवाय क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या नावाव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही.
मराठी भाषा दिनी पंतप्रधान मोदींचे मराठीकडे दुर्लक्ष; बेळगावात कन्नडमधून भाषणाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 1:04 PM