सुनील चावके -
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी ‘आप’साठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरलेले दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसर (दुरुस्ती) विधेयक राज्यसभेत
१ ऑगस्ट रोजी मांडले गेल्यास विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या आधारस्तंभांपैकी एक नेते शरद पवार मतदानासाठी उपस्थित राहतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी की ‘इंडिया’ यापैकी महत्त्वाचे कोण, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शरद पवार प्रमुख पाहुणे असलेल्या समारंभात १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हीच संधी साधून ‘इंडिया’ आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला न जाता राज्यसभेत मतदान करावे, असे प्रयत्न केजरीवाल आणि इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांच्या वतीने करण्यात येत आहेत; पण आपल्याच जिल्ह्यात होणारा पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम सोडून शरद पवार मतदानासाठी हजर राहण्याची शक्यता कमीच आहे.
राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करतील, तर शरद पवार पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थित राहतील. वंदना चव्हाण आणि फौजिया खान विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या चारपैकी दोन मतांची ‘इंडिया’ला, तर दोन मतांची मोदी सरकारला मदत होण्याची चिन्हे आहेत.