नवी दिल्ली : ‘पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडविण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनकारी योजना म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये जलद आणि अधिक परिणामकारक विकास झाला आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले.
पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (पीएमजीएस-एनएमपी) विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला होता. ही योजना रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळे, वाहतूक आदी पायाभूत सुविधा यांच्याद्वारे चालवली जाणारी योजना आहे.
नव्या संधींची निर्मिती- पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, या माध्यमातून विलंब कमी झाला आहे आणि अनेक लोकांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.- मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्टमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनाही टॅग केले. गोयल यांनी या योजनेची तीन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रशंसा केली.
नवनिर्मितीला प्रोत्साहन पीएमजीएस-एनएमपीच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी येथील भारत मंडपम येथे असलेल्या 'पीएम गतिशक्ती केंद्राला' अचानक भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या योजनेमुळे विकसित भारताचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे प्रगती, उद्योजकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल.
याचा उद्देश भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम विकासाला चालना देणे आहे.