चिक्कमगलुरू - कर्नाटकमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने बुथ लेव्हल म्हणजेच स्थानिक पातळीवरुन जोरदार कॅम्पेन केले. या निवडणुकांच्या प्रचारकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचे कटाऊट झळकावले होते. मात्र, आता हेच कटाऊट शेतकऱ्यांच्या शेतात उभारले आहेत. त्यामुळे मोदी, शाह आणि येडीयुरप्पा हे शेतकऱ्यांच्या शेतातील बुजगावणे बनल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी कर्नाटकात तगडा प्रचार केला. मोदींनीही अनेक सभा आणि रॅलींमधून कर्नाटकी जनतेशी संवाद साधला. त्यासाठी मोदी, शाह आणि येडियुरप्पांचे मोठे कटाऊट लावण्यात आले होते. मात्र, निवडणुकांच्या दोनच महिन्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांकडून या नेत्यांचे कटाऊट शेतात बुजगावणे म्हणून उभारण्यात आले आहे. शेतातील पिकांचे पक्षांपासून संरक्षण व्हावे यासाठी भाजप नेत्यांचे कटाऊट बुजागावणे म्हणून लावण्याची शक्कल येथील शेतकऱ्यांनी लढवली. लक्कावली हुबळीतील तरीकेले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे कटाऊट लावले आहेत.
पावसाची दमदार हजेरी झाल्यानंतर हुबळी आणि परीसरातील खेड्यांमध्ये जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पेरणीचा पहिला टप्पा पूर्ण केला. त्यामुळे शेतात येत असलेल्या पिकांचे पक्षांपासून संरक्षण करण्यासाठी येथील आम्ही हे कटाऊट लावत आहोत. यामध्ये विशेषत: एकाच पक्षाच्या नेत्यांचे लावत आहोत, असे नाही. तर निवडणूक काळात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात या नेत्यांचे कटाऊट लावण्यात आले होते. त्यामुळे जे मिळाले ते कटाऊट आम्ही शेतात उभे केले, असे तरीकेरे येथील शेतकरी राजेश मठपती यांनी म्हटले आहे.