- शीलेश शर्मानवी दिल्ली : गरीब, शेतकरी आणि कामगार यांना न्याय योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक पॅकेजवर पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन सावधपणे हटविण्याची गरज आहे. वृद्ध आणि गंभीर आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला हवी. अर्थव्यवस्थेत जे वादळ येणार आहे त्याची तयारी ठेवायला हवी. जे पॅकेज आहे ते कर्जाचे पॅकेज असायला नको. आज शेतकरी, मजूर आणि गरीब यांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याची गरज आहे. आपण कर्ज द्या; पण भारत मातेने आपल्या मुलांसोबत सावकाराचे काम करू नये. यावेळी त्यांना कर्जाची नव्हे, पैशांची आवश्यकता आहे. मी अशी विनंती करतो की, पंतप्रधानांनी या पॅकेजचा पुनर्विचार करावा. शेतकरी, मजुरांना थेट पैसे देण्याबाबत विचार करा.राहुल गांधी म्हणाले की, मी असे ऐकले आहे की, पैसे न देण्याचे कारण रेटिंग आहे. आर्थिक तूट वाढली तर बाहेरच्या एजन्सीज आमच्या देशाची रेटिंग कमी करतील. आमची रेटिंग कामगार, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक बनवितात. त्यामुळे रेटिंगबाबत विचार करू नका. त्यांना पैसे द्या.ते म्हणाले की, कोरोना संकटात मागणी आणि पुरवठा दोन्हीही बंद आहे. सरकारने दोन्ही बाजूंनी गती द्यावी. आता सरकारने कर्ज पॅकेज जाहीर केले आहे त्याने मागणी सुरू होणार नाही. कारण, विना पैसे लोक खरेदी कशी करणार? मागणी सुरू करण्यासाठी लोकांच्या हातात पैसा द्यावा लागेल. मागणी न सुरू झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ते नुकसान कोरोनापेक्षा मोठे असू शकते. आपण योजनेला नाव काहीही द्या; पण ती योजना लागू करा.
आर्थिक पॅकेजवर पंतप्रधान मोदींनी पुनर्विचार करावा, राहुल गांधी यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:11 AM