ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २४ - डीडीसीए गैरप्रकारावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका केल्याबद्दल भाजपातून निलंबित करण्यात आलेले किर्ती आझाद यांनी ' पंतप्रधान मोदींनी याप्रकरणात लक्ष घालून माझं काय चुकलं हे सांगावं' अशी मागणी केली आहे. 'पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे मला निलंबित करण्यात आले आहे, असे पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पण माझ्यावर कोणताही ठोस आरोप करण्यात आलेला नाही. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून मला पक्षातून काढण्यात आले का? मला याचे उत्तर हवे आहे' असे आझाद म्हटले.
अहमदाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल उत्तर दिले. पक्षाने मला पाठवलेल्या नोटीशीला मी आज संध्याकाळापर्यंत उत्तर देईन, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी मला त्यासाठी मदत करणार आहेत, असे आझाद यांनी सांगितले. डीडीसीएच्या प्रकरणाचा पक्षाशी काहीच संबंध नाही आणि माझी लढाईसुद्धा पक्षाबाहेर होती. मग तरीही मला निलंबित का करण्यात आले? पंतप्रधान मोदी आणि मार्गदर्शक मंडळाने याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी आझाद यांनी केली.
डीडीसीए प्रकरणी अरूण जेटलींविरोधात बोलणारे आझाद यांना काल पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात तत्काळ पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे भाजपातर्फे जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले होते. आझाद यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांना त्यांच्या ‘पक्षविरोधी वर्तणुकी’मागचे कारण देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या उत्तरावरच पुढची कारवाई निर्भर राहील, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान किर्ती आझाद यांच्या निलंबनावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ' ना खाऊंगा, ना खाने दूंगा, असे मोदीजी म्हणत होते, मग आता त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याला निलंबित का करण्यात आले?' असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.