अयोध्या :
रामजन्मभूमीवर मंदिर निर्माणाची तारीख विचारणाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी घरचा रस्ता दाखवला, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.
आपल्या पक्षाची व भाजपची विचारधारा एकच असून २०२४ च्या निवडणुकीत राज्यभर भगवा फडकेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती आहे. आम्ही अयोध्येतून नवी ऊर्जा घेऊन राज्यात जाऊ आणि जनतेची सेवा करू. २०२४ मध्ये शिवसेना आणि भाजपचा ‘भगवा’ संपूर्ण राज्यात फडकवला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शरयूकिनारी केली महाआरती अयोध्येतील रामकथा हेलिपॅडवर उतरलेल्या शिंदे यांनी आधी रामलल्ला आणि नंतर हनुमानगढीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह होते. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तलवार देऊन तर उपमुख्यमंत्र्यांना गदा भेट देऊन स्वागत केले. काही जणांनी मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाची भेटही दिली. सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी इतर नेत्यांसह शरयू किनारी महाआरती केली.
शिंदे काय म्हणाले? कोण रावण ते तुम्हीच सांगा...“रावणराज आहे, असे म्हणणाऱ्यांना सांगेन की, हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांना त्यांनी तुरुंगात टाकले. ते रावण आहेत की राम आहेत, मला सांगा?”आता साधूंची हत्या होणार नाही...मे २०२० साधूंची हत्या झाली तेव्हा ते शांत बसले होते, पण आमच्या सरकारमध्ये साधूंची हत्या होणार नाही, त्यांचे रक्षण केले जाईल. ...मूर्तीसाठी अयोध्येची माती नेणार आम्ही अमरावतीला अयोध्येची माती नेऊ आणि तिथे बजरंगबलीचा १११ फुटांचा पुतळा बसवू. हीदेखील आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. राममंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातून सागवान लाकूड येत आहे. अनेकांना हिंदुत्वाची ॲलर्जी अलिककडे काही लोकांना हिंदुत्वाची ॲलर्जी झालेली आहे, कारण ते देशातील प्रत्येक घराघरात पोहोचले तर त्यांचे दुकान बंद होईल. अयोध्या हा शिवसेना आणि भाजपसाठी राजकीय मुद्दा नाही, हा आमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे.