"पंतप्रधान मोदी बोलताहेत चीनची भाषा" गंभीर आरोप करत काँग्रेसने डागले पाच सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 09:00 PM2020-06-21T21:00:27+5:302020-06-21T21:51:18+5:30
लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यात भारताच्या भूभागावर झालेली चिनी घुसखोरी यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही तापले आहे. लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवाच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले. हीच भाषा चीनही बोलत आहे आम्ही भारताच्या कुठल्याही भागात घुसखोरी केली नसल्याचे सांगत आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.
अनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. यादरम्यान, देशाच्या भूमीचे रक्षण करताना कर्नल संतोष बाबूंसह २० जवान धारातीर्थी पडले. तर ८५ जण जखमी झाले. याशिवाय १० जवानांना चीनने पकडले होते. आता मोदी सांगत आहेत की चिनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला.
यावेळी कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाच सवालही डागले. ते पुढीलप्रमाणे
१) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य म्हणजे गलवान खोऱ्यातून चीनला हाकलवण्यासाठी गेलेल्या कर्नल संतोष बाबू आणि अन्य १९ जवानांच्या वीरतेचा आणि बलिदानाचा अवमान नव्हे काय?
२) चीनने गलवान खोऱ्यावर कधी दावा केला नव्हता? चीन आता गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे?
३) संरक्षण तज्ज्ञ, लष्करी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंच्या माध्यमातून चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. मग सरकार ही बाब का नाकारत आहे.
४) सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी आमच्या भूभागावर कुणीही घुसखोरी केली नसल्याचे सांगितले. मात्र नंतर पीएमओने आपल्या अधिकृत वक्तव्यातून हे विधान का हटवले. जर आमच्या क्षेत्रात कुणी घुसखोरी केली नसेल तर आमचे २० जवान कसे शहीद झाले?
५) गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या बांधकामाबाबत संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेले दावे पंतप्रधान मोदी का खोडून काढत आहेत?
इतर महत्त्वाच्या बातम्या