पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना गुजरातमधील दंगेखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत पुन्हा राज्यात दंगल करण्याची कुणी हिंमत केली नाही. असे शाह यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी कलम 370 क्षणात रद्द करण्याचे आणि प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे श्रेयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. ते शनिवारी गुजरातमधील साणंद येथे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करत होते.
शाह म्हणाले, “2002 मध्ये, दंगली झाल्या आणि त्यानंतर, मोदी साहेबांनी असे पुन्हा होऊ नये, यासाठी धडाही शिकवला. त्यानंतर दंगली झाल्या का? 2002 मध्ये दंगेखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत गुजरातमध्ये पुन्हा दंगे करण्याची कुणाची हिंमत झाली नाही." यावेळी त्यांनी "गुलामगिरीची मानसिकता मुळासकट नष्ट करण्यासोबतच भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा संकल्पही घेतला.
पाकिस्तानला धडा शिकवणे, अयोध्येत श्री राम मंदिर, याच वर्षात चंद्रावर चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि कलम 370 हटविणे, आदींसंदर्भात पंतप्रदान मोदींचे कौतुक करत शाह म्हणाले, "पूर्वी आपल्याकडे रोज बॉम्ब ब्लास्ट होत होते. प्रिंट मीडियाचे पत्रकार छापायचेही विसरून जात, एवढे स्फोट होत होते. ज्यांना अंत नव्हता. मात्र, आम्ही एकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला. नरेंद्र भाईंनी देश सुरक्षित केला."
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शाह म्हणाले, “मोदी साहेबांनी सरदार पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे स्वप्न एका झटक्यात पूर्ण केले. प्रभू श्री राम 500 वर्षांपासून तंबूत होते. मंदिर बांधता आले नाही. नरेंद्रभाईंनी मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले. संपूर्ण जग चंद्रावर पोहोचले पण आपला ध्वज पोहोचू शकला नव्हता. नरेंद्रभाईंनी चांद्रयान चंद्रावर पाठवले आणि शिवशक्ती पॉईंटवर आपला तिरंगा फडकवला. एवढेच नाही, तर नरेंद्र मोदी यांनी असे काम केले आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व पॅरामीटर्स गेल्या 75 वर्षातील सर्वोत्तम पातळीवर आहेत. 10 वर्षांचा विचार करता, नरेंद्रभाईंच्या कार्यकाळात सर्वाधिक औद्योगिक विकास झाला आहे," असेही शाह यांनी म्हटले आहे.