नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज अखेर त्यांचा मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने ट्विट करुन प्रणव मुखर्जी यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यानंतर, सोशल मीडियातून त्यांच्या आठवणी जागवत श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची पहिली शपथ तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून घेतली होती. मोदींनी तो फोटो शेअर करत, सन 2014 मध्ये मी प्रथम दिल्लीत आलो होतो, त्यावेळी त्यांनी मला आशीर्वाद देत मोठं मार्गदर्शन केलं. त्यांच्यासोबतचा संवाद आणि सहवाह मोलाचा होता, असे मोदींनी म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही राष्ट्रपती म्हणून ते सहज उपलब्ध होत. देशविकासात त्यांचं मोलाचं योगदान असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली अर्पित केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन त्यांनी शोक व्यक्त केला.
देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून आणि नेटीझन्सकडूनही प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त होत आहे.
प्रणव मुखर्जींचा जीवन परिचय थोडक्यात
प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
प्रणव मुखर्जींचा जन्म बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कामदा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी मुखर्जी यांच्या घरी झाला होता. त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते. १९६९ मध्ये ते प्रथम राज्यसभेवर नियुक्त झाले होते. १९६९ ते २००२ अशी तब्बल ३४ वर्षे त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच २००४ ते २०१२ या काळात ते लोकसभा सदस्य होते. या काळात त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील नेते म्हणून काम पाहिले. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जींनी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले. तसेच १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.