पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा बिहार दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. ते सोमवारी राजधानी पाटण्यात पोहोचतील.
रात्री राजभवनात विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी ते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत सुशीलकुमार मोदी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजेंद्रनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जातील. सुशीलकुमार मोदी यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यानंतर पंतप्रधान सीवान आणि महाराजगंज सीमेवरील गोरियाकोठी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करतील. तेथून ते पूर्व चंपारणला जातील. तेथे त्यांची दुसरी जाहीर सभा होईल. मोदी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी १९ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बेतिया येथे प्रचार सभा आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींचा हा सातवा बिहार दौरा असेल. २१ मे रोजी दोन जाहीर सभा घेऊन ते तीन मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार करतील. पहिली सभा सीवानमधील जेडीएस उमेदवार विजयलक्ष्मी कुशवाहा आणि महाराजगंज येथील उमेदवार जनार्दन सिंह यांच्या प्रचारार्थ असेल तर, दुसऱ्या सभेत ते पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राधा मोहन सिंह यांना विजयी करण्याचे आवाहन करतील. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा कडक करण्यात येत आहे. मोदी १२ मे रोजी पाटण्यात रोड शो करून परतल्यानंतरही एसपीजीचे पथक येथेच थांबले होते.