मराठा आरक्षणासह राज्याचे प्रश्न पंतप्रधान मोदी सोडवतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:50 AM2021-06-09T06:50:32+5:302021-06-09T06:51:29+5:30
Uddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
- विकास झाडे
नवी दिल्ली : जवळपास १२ विषयांवर तब्बल ९० मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून पंतप्रधान हे विषय मार्गी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी नवीन महाराष्ट्र सदनात पत्रकारांना या बैठकीचा आढावा दिला. ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्यात कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. चर्चेअंती आम्ही तिघेही समाधानी आहोत. आम्ही मांडलेले प्रश्न पंतप्रधान नक्की सोडवतील असा विश्वास आहे.
अजित पवार म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण काढण्यात आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यात अडचण निर्माण झाली आहे. सर्व राज्यांसाठी धोरण अवलंबण्यात यावे, असा आम्ही पंतप्रधानांकडे आग्रह धरला आहे. केंद्राकडे थकीत असलेला जीएसटीचा परतावा मिळावा, १२०८ कोटी प्रलंबित निधी मिळावा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये हानी होऊ नये म्हणून समुद्रात संरक्षण भिंत आणि पायाभूत सुविधांसाठी ५ हजार कोटी रुपयांची केंद्राने मदत द्यावी, याशिवाय पीकविम्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे!
मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीचे अधिकार आता केंद्र सरकारकडे असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे द्यावे अशी मागणी ठाकरे, चव्हाण आणि पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. त्यावर मोदी यांनी सर्व माहिती घेऊन योग्य कार्यवाही करू, असे आश्वासन दिले आहे.
ठाकरे-मोदी यांची वैयक्तिक भेट!
ठाकरे यांनी मोदींना वैयक्तिक भेटीसाठी वेळ मागून घेतल्याची चर्चा होती. यावर ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांसोबत राजकीय भेट नव्हती. आम्ही सत्तेत एकत्र नाही म्हणून आमचे नाते तुटले का? देशाच्या पंतप्रधानांना भेटण्यात गैर काय आहे? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो.
ठाकरेंची सदनात पहिली पत्रकार परिषद
ठाकरे यांची महाराष्ट्र सदनात ही पहिली पत्रकार परिषद होती. महाराष्ट्र सदनात प्रवेश करताच ठाकरे यांनी सदनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत अभिवादन केले.
कोविड नियमांचा फज्जा!
ठाकरे यांची महाराष्ट्र सदनात पहिलीच पत्रकार परिषद होती. दिल्लीत कोरोनाचे भय अद्यापही आहे. आजच्या पत्रकार परिषदेत माध्यमातील प्रतिनिधींची एकच झुंबड होती. त्यामुळे कोविड नियमांचा संपूर्ण फज्जा उडाला होता.
या मुद्द्यांवर झाली चर्चा
- मराठा आरक्षण
- केंद्राकडे थकित जीएसटीचा परतावा
- इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण
- मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण
- मेट्रो कारशेडसाठी
कांजूरमार्ग जागेची उपलब्धता
- राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
- शेतकरी पीकविमा अटींचे सुलभीकरण
- राज्यात बल्क
ड्रग पार्क तयार करणे
- मदतीसाठी
एनडीआरएफचे निकष बदलणे
- शहरी आणि पंचायत राज संस्थांचा थकीत असलेला निधी