ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिलला संसदीय अधिवेशन संपल्यानंतर हे फेरबदल होणार आहेत. अनेक महत्वाची पदं रिक्त करण्यासाठी तसंच त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी देण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या संरक्षण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधीच अर्थ मंत्रालय सांभाळणा-या अरुण जेटलींवर कामाचं ओझं त्यामुळे वाढलं आहे. त्यांच्यावरील हा भार कमी करण्याच्या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दुस-याकडे सोपवण्याची शक्यता आहे.
2014 मध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुरुवातीला अरुण जेटलींवर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर मनोहर पर्रीकरांना गोव्याहून केंद्रात बोलावून संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. एकीकडे अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालय सांभाळायचं आहे, दुसरीकडे त्यांना संरक्षण मंत्र्याच्या नात्याने या विभागासाठी निधीची मागणीही करायची असल्याने त्यांची परिस्थिती अवघडल्यासाठी झाली आहे.
सुषमा स्वराज यांच्यावर झालेल्या किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमुळे त्यांच्याकडील परराष्ट्र मंत्रालय काढून दुस-याला देण्यात येणार असल्याचीही चर्चा केली जात आहे. पण दुसरीकडे बुधवारी तीन महिन्यांनी लोकसभेत परतलेल्या सुषमा स्वराज एकदम फिट होत्या. त्यांनी लोकसभेत 15 मिनिटं भाषण केलं, आणि विशेष म्हणजे भाषण संपेपर्तय त्या उभ्या होत्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेरबदल करत असताना काही नवे चेहरे जोडले जाण्याची शक्यता आहे. काही राज्यमंत्रींना प्रमोशन दिलं जाऊ शकतं. मोदी सरकार एकीकडे आपलं तिसरं वर्ष पुर्ण करत असून नवीन चेहरे आणून महत्वाची मंत्रालयं मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
मोदी सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रउद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं, आणि त्यांच्या जाही प्रकाश जावडेकरांना आणण्यात आलं. वैंकय्या नायडू यांना जेटलींच्या जागी सूचना आणि प्रसारण मंत्रालय सोपवण्यात आलं. पत्रकारितेतून राजकारणात आलेले एम जे अकबर यांना परराष्ट्र राज्य मंत्री बनवण्यात आलं.