नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव घेताना आदरयुक्त शब्द वापरले नाहीत म्हणून बीएसएफ जवानाचा सात दिवसाचा पगार कापण्याचा वादग्रस्त निर्णय अखेर बीएसएफने मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:या वृत्ताची दखल घेत नाराजी प्रगट केल्यानंतर बीएसएफने हा निर्णय मागे घेतला. या जवानाने मोदींच नाव घेताना आदरणीय किंवा श्री हे शब्द वापरले नव्हते म्हणून त्याचा सात दिवसाचा पगार कापण्यात आला होता.
21 फेब्रुवारीला बीएसएफच्या 15व्या तुकडीच्या मुख्यालयात झीरो परेड सुरू होती. त्यावेळी जवान संजीव कुमार यांनी एक रिपोर्ट देताना अनवधानाने 'मोदींचा कार्यक्रम' असा उल्लेख केला होता. तो ऐकून कमांडिंग ऑफिसर अनूप लाल भगत चिडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाआधी 'माननीय' किंवा 'श्री' न वापरल्याबद्दल संजीव कुमारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर संजीव यांनी केलेल्या 'चुकी'बाबत सुनावणी झाली आणि बीएसएफ कायद्याच्या कलम 40 अन्वये त्यांना दोषी धरण्यात आलं. त्या अंतर्गतच त्यांचं सात दिवसांचं वेतन कापण्यात आलंय. ही शिक्षा जरा अतीच झाली, असं अनेक अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती.