पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे 2022 रोजी नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणानंतर त्यांचा हा दौरा ठरला आहे. पंतप्रधान मोदी वर्ष 2014 नंतर पाचव्यांदा नेपाळ दौऱ्यावर जात आहेत. खरे तर त्यांचा हा दौरा चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, नेपाळ सरकारने आपल्या देशातील महत्वाचे प्रोजेक्ट्स चिनी कंपन्यांऐवजी भारतीय कंपन्यांना देण्याच्या निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नेपाळचे पंतप्रधान आणि पीएम मोदी यांच्यात चर्चाही होणार आहे. यामुळे चीनला मिर्ची झोंबणे सहाजिकच आहे. एवढेच नाही तर, चीनचे लक्षही पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर असेल. आपल्या नेपाळ दौऱ्यावर मोदी गौतम बुद्ध यांचे आवडते स्थळ असलेल्या लुंबिनीलाही भेट देतील.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणानंतर, पंतप्रधान मोदी बुद्ध पौर्णिमेच्या मूहुर्तावर नेपाळला जाणार आहेत. यादरम्यान ते लुंबिनीलाही भेट देतील. लुंबिनी येथे पवित्र मायादेवी मंदिरात जाऊनही पूजा करतील. एवढेच नाही, तर आयोजित केलेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमालाही पंतप्रधान संबोधित करतील.
याशिवाय, लुंबिनी मठ क्षेत्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघ (आयबीसी), नवी दिल्लीशी संबंधित असलेल्या एका भूखंडावर पंतप्रधान मोदी बौद्ध संस्कृती आणि वारशाशी संबंधित एका केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमातही भाग घेतील. तसेच दोन्ही देशाचे पंतप्रधान एका द्विपक्षीय बैठकीतही भाग घेतील.