कन्याकुमारी (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विवेकानंद शीळा स्मारकावरील ४५ तासांची ध्यान साधना शनिवारी पूर्ण केली. तमिळ संतकवी तिरुवल्लुवर यांना पुष्पांजली वाहून त्यांनी ध्यान साधनेची पूर्णाहुती केली. ध्यान साधना संपल्यानंतर शुभ्र वस्त्रे परिधान करून मोदी यांनी स्मारकापासून जवळच असलेल्या तिरुवल्लुवर यांच्या १३३ फूट उंच प्रतिमेला विशाल पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
स्मारकावरील आपल्या वास्तव्यादरम्यान पंतप्रधानांनी ध्यान लावले तसेच सूर्योदयाच्या वेळी सूर्यास ‘अर्घ्य’ दिले. ‘सूर्य अर्घ्य’ ही आध्यात्मिक अभ्यासाशी संबंधित परंपरा असून, त्यात सूर्याला जल अर्पण करून नमन केले जाते. विवेकानंद शीला स्मारकावर ध्यान करताना मोदी यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेले कन्याकुमारी हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध असून, विवेकानंद शीला स्मारक याच किनाऱ्याजवळील एका छोट्या खडकाळ बेटावर स्थित आहे.
या बेटावरील शीलेवर स्वामी विवेकानंद यांनी ध्यान धारणा केली होती. नंतर त्यांच्या स्मरणार्थ याच बेटावर त्यांचे स्मारक उभारण्यात आले. ते विवेकानंद शीला स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांनी ३० मेरोजी संध्याकाळी विवेकानंद शीला स्मारकावर ध्यान साधना सुरू केली होती.