ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता जशी खूप आहे. तसेच त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या शाब्दिक चकमकी सोशल मीडियावर रोजच घडत असतात. पण आता चक्क मोदींमुळे वधू-वरांचे लग्न मोडल्याची विचित्र घटना कानपूरमध्ये घडली आहे. येथील एका व्यावसायिकाचे लग्न सरकारी कर्मचारी असलेल्या मुलीसोबत ठरले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींवरून वधू-वरांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला आणि अखेर त्याची परिणती ठरलेले लग्न मोडण्यात झाली.
त्याचे झाले असे की हे वधू-वर आपल्या लग्नाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी परिवारासह एका मंदिरात गेले होते. तेथे सुरुवातीला सारे काही आलबेल होते. पण त्याचदरम्यान देशाच्या आर्थिक स्थितीवरून त्यांच्यात चर्चा सुरू झाली. यातील वधूने देशाची आर्थिक स्थिती वाईट असल्याचे सांगत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी ठरवले. तर वराला मोदींविरोधात एकही शब्द ऐकायचा नव्हता. बघता बघता हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले.
संतापलेल्या वधूने लग्नासाठी आपण आपले विचार बदलू शकत नाही असे सांगितले. तर मोदींचा कट्टर समर्थक असलेल्या वराने मोदींविरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही असे सांगितले. अखेर वधूने लग्न करण्यास नकार दिला. दोन्ही कुटुंबियांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही आपापल्या मतांवर ठाम राहिले. जी व्यक्ती आपल्या मतांची कदर करत नाही, त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्यभर संसार कसा काय करता येईल, असे या वधूने लग्न मोडण्याच्या आपल्या निर्णयावर सांगितले.