नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. मोदी सध्या गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ते बोलत होते.
मोदी म्हणाले, “आज येथे निमलष्करी दलाचे संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. या हल्ल्यात आपल्या वीर जवानांना होतात्म्य आले. मात्र, त्यावेळी संपूर्ण देश दुःखात असताना काही लोक या दुखात सहभागी नव्हते. ते पुलवामा हल्ल्यात आपला राजकीय स्वार्थ शोधत होते. हे देश कधीही विसरणार नाही. त्यावेळी केलेली वक्तव्ये आणि राजकारण देश कधीच विसरू शकत नाही. देशावर एवढा मोठा घाव झालेला असताना, काही लोकांना यात राजकारण दिसत होते. अशा पक्षाच्या नेत्यांवर बरसताना मोदी म्हणाले, ते व्हा ते सर्व आरोप झेलत होते, अनेक वाईट गोष्टी एकत राहिले. माझ्या मनावर वीर जवानाच्या हौतात्म्याचा घाव होता. मात्र, काही दिवसांपूर्वी शेजारील देशांतून ज्या बातम्या आल्या, तेथील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारले गेले, त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आला आहे.”
काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत; फ्रान्स कार्टून वादावर मोदींचं भाष्य, म्हणाले...काँग्रेसचे नव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे विरोधकांनी दाखवले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेले राजकारण याचे मोठे उदाहरण आहे. तेव्हा काय-काय बोलले गेले, कशा प्रकारची विधाने केली गेली, हे देश कधीही विसरू शकत नाही.
सुरक्षादलाचे मनोबल वाढवा, राजकारण करू नका -पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अशा काही राजकीय पक्षांना विनंती करतो, की देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षण दलाच्या मनोबलासाठी कृपा करून, अशा प्रकारचे राजकारण करू नका. आपल्या स्वार्थासाठी आपण नकळत देशविरोधी शक्तींचा हातचे खेळणे होऊन, ना देशाचे हित करू शकाल, ना आपल्या पक्षाचे, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या, की आपल्या सर्वांसाठी देशहित सर्वात महत्वाचे आहे. आपण जेव्हा सर्वांच्या हिताचा विचार करू तेव्हा आपलीही प्रगती आणि उन्नती होईल. आपली विविधताच आपले अस्तित्व आहे. मोदी म्हणाले, आपण एक असू तर असाधारण असू. मात्र सहकाऱ्यांनो, हेही लक्षात असू द्या, की भारताची ही एकतेची ताकद दुसऱ्यांना नेहमीच खटकत असते, असेही मोदी म्हणाले. तत्पूर्वी, मोदींनी केवडिया येथील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेलांना भिवादन केले.