ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 66वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस गुजरातमध्येच साजरा करण्याचं मोदींनी ठरवलं आहे. आज सकाळी गांधीनगरमध्ये जाऊन मोदींनी आपली आई हिराबा यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला. विशेष म्हणजे आईची भेट घेण्यासाठी जाताना मोदींनी गाड्यांचा आणि अधिका-यांचा ताफा सोबत नेणं टाळलं. ज्या कारमधून मोदी गेले फक्त ती एक कारच त्यांच्योसबत होती. वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवण्यात आला आहे. प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत देशाला गौरवान्वित करणाऱ्या देशातील सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरला जाणार आहे. विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेखही त्यावर असेल. सुरत येथे हा केक कापण्यात येणार आहे. गुजरातची प्रसिद्ध अतुल बेकरी, शक्ती ही स्वयंसेवी संस्था तसेच देशभरात ३० पेक्षा जास्त गिटार केंद्र संचालित करणाऱ्या ‘गिटार मॉन्क’ या संस्थेने मोदींचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालविली आहे.
१० हजार मुलींना वाटणार केक -
स्वच्छ भारत आणि मुलींना मोफत पुस्तके पुरविण्यासारख्या सामाजिक कार्यात भूमिका बजावणाऱ्या अतुल बेकरीने हा केक नि:शुल्क तयार करण्याचे काम चालविले आहे. हा केक कापल्यानंतर दिव्यांग, कमकुवत आणि वंचित घटकांमधील सुमारे १० हजार मुलींना वाटला जाणार आहे. विकास आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या हदपाडी आणि कोटवाडियासारख्या अतिमागास समुदायासाठी काम करणाऱ्या शक्ती फाऊंडेशनने या अनोख्या केकला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. देशभरातील एक हजाराहून अधिक युवा गिटारवादक सुरतमध्ये एकत्र येणार असून ते गिटार मॉन्कच्या नेतृत्वात शांततेचा संदेश देण्यासह मोदींच्या जन्मदिनानिमित्त खास धून वाजवणार आहेत.
सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लिमखेडा इथं वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर दुपारी 2 वाजताच्या सुमारास नवसारीत मोदींच्याच हस्ते 11 हजार 200 दिव्यांगांना वेगवेगळ्या उपकरणांचं वाटप केलं जाणार आहे. तर 2200 जणांना श्रवणयंत्र आणि 1200 व्हील चेअर वाटप करण्यात येणार आहे.