देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान, पंतप्रधान मोदींचा सायरा बानोंना फोन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सर्वसामान्य चाहतेही आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर, दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही दिलीपसाहब यांच्या निधनानंतर, ही देशाची सांस्कृतिक हानी असल्याचे सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.
पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी 'मुगल-ए-आजम', 'देवदास', 'नया दौर', 'राम और श्याम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला 'किला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. चाहत्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांनी सायरा बानो यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला.
दिलीप कुमार यांना ३० जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे दहा दिवसांच्या उपचारानंतर, जेव्हा त्यांना आराम वाटू लागला, तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले होते, मात्र, बुधवारी पहाटे त्यांचं निधन झाले.