ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. 3 - देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मात्र जीएसटीबाबत अजूनही व्यापा-यांचा विरोध कायम आहे. मोदींच्याच गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात आंदोलन पुकारलं आहे.
सुरतमध्ये जीएसटीचा विरोध करण्यासाठी कापड मार्केट बंद करुन व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि विरोधात घोषणाबाजी सुरु केली. विरोध करत असताना व्यापारी आक्रमक झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी व्यापा-यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे भाजपा सरकारवर टीका सुरू आहे. जीएसटी हटवून सोपी करप्रणाली आणावी, अशी व्यापा-यांची मागणी आहे.
यापुर्वी शुक्रवारी जीएसटीच्या विरोधात व्यापा-यांनी झांसी एक्सप्रेसला कानपूरजवळ अडवलं होतं. देशाच्या विविध भागांमध्ये जीएसटीविरोधात प्रदर्शन केलं जात आहे.