ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - विजयादशमीच्या मुहूर्तावर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये (जेएनयू) रावणाचे दहन करताना काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिमा जाळल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे. मंगळवारी देसभरात उत्साहात दसरा साजरा करण्यात आला. चांगल्याचा वाईटावर विजय , वाईट शक्तींचा नाश व्हावा म्हणून या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येते. नुकताच झालेल्या ' उरी ' हल्ला व त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती न थांबल्याने अनेकांनी देशभरात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ, २६/११ चा मास्टरमाईंड हफिज सईद यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. मात्र दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये मात्र देशाच्या पंतप्रधानांचाच प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
या रावणदहनाचा व्हिडिओ समोर आला आहे. दसऱ्याच्या संध्याकाळी एनएसयूआयच्या (नॅशनल स्टुडण्ट्स युनियन ऑफ इंडिया) कार्यकर्त्यांनी हे पुतळा दहन केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या पुतळ्याचे दहन एनएसयूआयनेच केले आहे का? याची पुष्टी मात्र अद्याप होऊ शकलेली नाही. 'सरकराने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता न झाल्यानेच त्या निषेधार्थ आपण ही कृती केली' अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली. यावेळी योगगुरु रामदेव, साध्वी प्रज्ञा, नथुराम गोडसे, आसाराम बापू यांच्या प्रतिमांचेही विद्यार्थ्यांनी दहन केले.
काही महिन्यांपूर्वीच कथित देशविरोधी घोषणांवरुन जेएनयूतील विद्यार्थी अडचणीत आले होते. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रतिमा जाळल्यामुळे जेएनयूतील विद्यार्थी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. जेएनयूच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.