नवी दिल्ली - देशात गेल्या काही आठवड्यांपासून लडाखच्या सीमेवर भारत-चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनच्या 43 सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. तेव्हापासून देशभरातून चीनवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. तर, भारतीयांनी चिनी अॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. त्यातच, मोदी सरकारने चीनच्या 59 अॅप वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारने बॅन केलेल्या 59 अॅपप्सपैक एका अॅप्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हेरीफाईड अकाऊंट असल्याचे चीनच्या सत्ताधारी पक्षाचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. त्यामध्ये भारतातील लोकप्रिय सोशल मीडिया अॅप असलेल्या टीकटॉकचाही समावेश आहे. टीकटॉक बंद झाल्याने टीकटॉक स्टार आणि टीकटॉकद्वारे मनोरंजन करणारे युजर्सं निराश झाले आहेत. त्यातच, आता प्ले स्टोअरवरुन हे अॅप काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने टीकटॉक इन्स्टॉल होऊ शकणार नाही. मात्र, ज्या कोट्यवधी युजर्संने हे अॅप डाऊनडोल केले आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये हे कार्यरत असल्याचे दिसून येते. टीकटॉकसह 59 अॅप्स सरकारने देशात बॅन केले आहेत. सरकारच्या या बॅनलिस्टमधील एका अॅपमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदींचे व्हेरीफाईड अकाऊंट आहे.
चीनमधील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. भारताने बॅन केलेल्या 59 अप्सपैकी ट्विटरसारखे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं Vigo अॅपही आहे. ज्या अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हेरीफाईड अकाऊंट असून त्यावर 2 लाख 40 हजार फॉलोवर्स आहेत, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. तर इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनने हा सेक्शन 69 ए अंतर्गत जारी केलेला आदेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही सर्वप्रथम युजर्संसाठी पारदर्शिता आणि डिस्क्लोजरला प्राधान्य देतो, असेही फाऊंडेशनने म्हटले आहे .
दरम्यान, देशातील लडाखच्या भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच केंद्र सरकारने 59 चायना अॅप बंदीचा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाºया चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.