वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील तसंच राज्यातील बडे अधिकारीदेखील सोबत आहेत. दरम्यान शनिवारी रात्री पंतप्रधानांनी प्रोटोकॉल तोडत शहराचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (14 जुलै) सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझमगडचा दौरा केला आणि त्यानंतर आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये ते पोहोचले. यावेळी रात्री अचानक ते गेस्ट हाऊसमधून बाहेर पडले व बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पस परिसराची भ्रमंती केली. विद्यापीठ परिसरात असलेल्या विश्वनाथ मंदिराला भेट देऊन त्यांनी पूजादेखील केली.
बनारस हिंदू विद्यापीठातील विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर लंका, गुरुधाम, रविंद्रपुरी, भेलूपूर, मदनपुरा, गोदौलिया, चौक, मैदागीन, लहूराबीर, अंधरापूल, आंबेडकर चौक, सर्किट हाऊस, नदेसर, कँट रेल्वे स्टेशन आणि लहरतारा परिसरातही त्यांनी फेरफटका मारला. तब्बल तासभर मोदींनी या परिसराची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. वाराणसीतील डिरेका गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये बसण्यापेक्षा वाराणासीचा दौरा करण्यास पसंती दिली.