नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ आणि २३ मे रोजी इराणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूने संपन्न असलेल्या इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध हटविण्यात आले असताना मोदी त्या देशाच्या दौऱ्यावर जात आहेत, हे विशेष.इराणमधील खनिज तेलाची आयात दुप्पट करणे आणि तेथील गॅस प्रकल्पांमध्ये भागीदार बनण्याचा भारताचा विचार आहे. काही वर्षांपूर्वी इराण हा भारताला खनिज तेल पुरविणारा जगातील दुसरा सर्वांत मोठा देश होता. उभय देशांदरम्यान राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चाबहार बंदराच्या विकासाचा करार केला जाणार आहे.इराणचे अध्यक्ष डॉ. हसन रुहानी यांच्या आमंत्रणावरून मोदी इराणला जाणार आहेत. मोदी इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांची भेट घेतील. तसेच अध्यक्ष रुहानी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान मोदी २२ मे रोजी इराण दौऱ्यावर
By admin | Published: May 18, 2016 4:29 AM