ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.3 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे युद्धपिपासून आहेत, असे टीकास्त्र काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सोडले आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भाजप सरकारचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. स्वतः काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मात्र दिग्विजय सिंह यांनी पूर्णतः विरोधी भूमिका मांडली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भूमिका मांडली आहे.
आणखी बातम्या:
यूपीए सरकारच्या काळातही अशा प्रकारेच सर्जिकल स्ट्राईक झाले आहेत, मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या गोष्टी बाहेर जाणार नाहीत, याची योग्य काळजी घेतली, असेही त्यांनी नमूद केले. तर सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कनिष्ठ नेते देखील आपली पाठ थोपटून घेत असल्याची टिप्पणी देखील दिग्विजय यांनी केली आहे. सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना, 'नरेंद्र मोदींची 56 इंची छाती आता 100 इंचाची झाली आहे', अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. यावर बोलताना दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि अजित डोवल हे युद्धपिपासू आहेत, अशी टीका केली आहे.