नवी दिल्ली - इव्हीएम, निवडणूक आयोग, न्यायालये अशा संस्थांवर संशय घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, सीएजीसारख्या संस्थांनाही टीकेमधून सोडलेले नाही. काँग्रेसचा डीएनए अजूनही तसाच आहे. ते जेव्हा जिंकतात तेव्हा इव्हीएम योग्य असल्याचे सांगतात. मात्र निकालांपूर्वी इव्हीएमबाबत संशय निर्माण करतात, असा टोला मोदींनी लगावला आहे.
तामिळनाडूमधील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीनी सांगितले की, काँग्रेस आणि त्याच्या या धोकादायक खेळाबाबत लोकांना माहिती दिली गेली पाहिजे. काँग्रेसने लष्कर, सीएजी आणि लोकशाही व्यवस्थेतील आवश्यक अशा संस्थांचा अवमान केला आहे.'' यावेळी काँग्रेसकडून इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या संशयावरही मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. '' काँग्रेसवाले इव्हीएमबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र निकाल आपल्या बाजूने लागला की ते निकाल स्वीकारतात. ''