"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 09:23 PM2024-11-29T21:23:33+5:302024-11-29T21:24:10+5:30
हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते, पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे...
काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर, त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला. हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते, पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांना या चौकीदाराबद्दल अपशब्द वापरण्याची संधी मिळाली नाही, अशा शब्दांत आज (29 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर थेट निशाणा साधला. ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
काय म्हणाले मोदी? -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर, त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला. ते आता देशाविरुद्ध कटकारस्थान रचत आहेत. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा लोकांपासून सावध राहावे लागेल. हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते. पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांना या चौकीदाराबद्दल अपशब्द वापरण्याची संधी मिळाली नाही."
हरियाणा, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये भाजपच्या वाढत्या शक्तीसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "राजकीय तज्ज्ञांनी ओडिशामध्ये भाजपला फेटाळले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी त्यांचे अंदाज चुकीचे ठरवले. ओडिशातील जनतेने स्वतःला 'तीस मार खाँ' समजणाऱ्या लोकांनाही चोख प्रत्युत्तर दिले. भाजपला केवळ ओडिशातच नव्हे तर हरियाणा आणि महाराष्ट्रातही मोठे समर्थन मिळाले आहे." एवढेच नाही तर, यावेळी मोदींनी ओडिशातील उत्सवाच्या अनुभवांचे वर्णन करताना, ओडियाची संस्कृती आणि वारशाचेही कौतुक केले.
...ही मोदींची गॅरंटी -
यावेळी, आपले सरकार जे बोलले ते पूर्ण करते, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी जनतेला दिला. ते म्हणाले, "...म्हणूनच मी म्हणतो, मोदींची गॅरंटी म्हणजे प्रत्येक गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. आमचे सरकार प्रत्येक गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी देते."