काठमांडू: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेपाळ दौऱ्यात क्रिकेट संदर्भ देत संवाद साधला. त्यांनी काठमांडूमध्ये लोकांना संबोधित करताना क्रिकेटच्या माध्यमातून नातं जोडण्याचा प्रयत्न केला. आयपीएलमुळे नेपाळ आणि भारत एकमेकांशी जोडले गेल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. दोन देशांमधील संबंध यापुढे आणखी मजबूत होतील, अशा शब्दांमध्ये मोदींनी नेपाळमध्ये बॅटिंग केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यात क्रिकेटचा उल्लेख केला. 'आता आपण क्रिकेटच्या माध्यमातूनही जोडले गेलो आहोत. नेपाळचा मुलगा आयपीएलमध्ये खेळतो आहे,' असं मोदींनी म्हटलं. यावेळी मोदींनी संदीप लामिचाने यांचा उल्लेख केला. संदीप लाचिमाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. जानेवारी महिन्यात आयपीएलसाठी लिलाव झाला होता. दिल्ली डेअरडेविल्सनं संदीपला संघात घेतलं होतं. सतरा वर्षांच्या संदीप लामिचाने या फिरकीपटूनं दोन वर्षांपूर्वी झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली होती. संदीपच्या शानदार कामगिरीमुळे नेपाळनं आठवं स्थान मिळवलं होतं. दिल्ली डेअरडेविल्सच्या संघानं संदीपसाठी 20 लाख रुपयांची बोली लावली होती.
मोदींची 'आयपीएल डिप्लोमसी'; नेपाळ दौऱ्यात जोरदार बॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 7:03 PM