नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास 93 मिनिटांचे भाषण केले. नरेंद्र मोदींचे हे आत्तापर्यंतचं दुसरं मोठं भाषण आहे. याआधी 2016 मध्ये नरेंद्र मोदींनी 94 मिनिटांचे भाषण केले होते. जे सर्वात जास्त वेळ दिलेलं भाषण आहे.
यापूर्वी 2018 मध्ये मोदींनी 82 मिनिटं भाषण केले. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले चौथं मोठं भाषण होतं. 2018 मध्ये ध्वजारोहण केल्यानंतर 7 वाजून 33 मिनिटांनी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. तर 8 वाजून 55 मिनिटांनी त्यांचे भाषण संपले. 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला सर्वात लहान भाषण केले. या भाषणाचा वेळ 56 मिनिटं होता. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरुन देशाला पहिल्यांदा संबोधित केलं. त्यावेळी त्यांच्या भाषणाचा कालावधी 65 मिनिटे होता. त्यानंतर 2015 रोजी नरेंद्र मोदींनी 88 मिनिटे भाषण केले. त्यानंतर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी 94 मिनिटे भाषण केले. ते आजपर्यंत केलेले सर्वात मोठे भाषण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य दिनी इतर कोणत्याही पंतप्रधानांचे भाषण इतके लांब झाले नाही. नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त 50 मिनिटे भाषण केले. मनमोहन सिंग यांनी 2005 आणि 2006 मध्ये सर्वात लांब भाषण केले. तर स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला 35-40 मिनिटे त्यांनी भाषण केले होते.
2004 मध्ये मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांनी 45 मिनिटे भाषण केले होते. तर 2012 मध्ये मनमोहन सिंग यांनी सर्वात कमी वेळ भाषण केले. त्यांच्या भाषणाचा कालावधी 32 मिनिटे होता. तर 2013 मध्ये मनमोहन सिंग यांनी 35 मिनिटे भाषण केले. आपल्या भाषणामुळे प्रसिद्ध असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कधीही स्वातंत्र्य दिनावेळी लांबलचक भाषण केले नाही. वाजपेयींनी 2002 मध्ये 25 मिनिटे भाषण केले. तर 2003 मध्ये 30 मिनिटे भाषण केलं होतं.